
मोशीतील ‘आय.आय.एम.’ उभारणीला गती; प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी
– आमदार महेश लांडगे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग
– पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक, संशोधन व पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या भारतीय व्यवस्थापन संस्था (आय.आय.एम.)च्या मोशी येथील प्रस्तावित कॅम्पसच्या उभारणीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आय.आय.एम. पुणे संस्थेच्या उभारणीसाठी प्रस्तावित जागेची बुधवारी (दि. ७) प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान संस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन, पायाभूत सुविधा, प्रशासकीय बाबी आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून मोशी येथे आय.आय.एम.चे कॅम्पस उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने मोशी येथील शासकीय जमीन आय.आय.एम. नागपूरच्या शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पससाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. जुलै २०२६ मध्ये केंद्र सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मोशी येथे ७० एकर क्षेत्रावर पूर्ण क्षमतेचे शैक्षणिक व निवासी कॅम्पस विकसित करण्याची योजना असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आय.आय.एम. नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी, सदस्य प्रा. भीमराया मेट्री, अरुण अनंत व प्रा. प्रशांत गुप्ता, तसेच बांधकाम समितीचे अध्यक्ष वैभव डांगे आणि सदस्य आशु तोमर, प्रा. सोम शेखर भट्टाचार्य व प्रा. राठ यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली. महसूल विभागाचे मंडल अधिकारी श्री. सैद व संबंधित तलाठी, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी जगदाळे व बोऱ्हाडे यांनी जागेची सद्यस्थिती, उपलब्ध क्षेत्र, प्रशासकीय प्रक्रिया आणि आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती दिली. यावेळी आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड उपस्थित होते.
स्थळ पाहणीदरम्यान प्रस्तावित कॅम्पसच्या उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील शैक्षणिक, संशोधनात्मक व विकासात्मक प्रकल्प, विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत सुविधा आणि संस्थेच्या उभारणीसाठीची पुढील प्रशासकीय कार्यवाही याबाबत उपस्थित मान्यवर आणि अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. आय.आय.एम.च्या पुणे कॅम्पससाठी मोशीची निवड झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक परिसंस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. व्यवस्थापन शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन आणि उद्योग-शिक्षण क्षेत्रातील सहकार्याला यामुळे नवे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. आय.आय.एम. नागपूरने यापूर्वीही पुणे कॅम्पससाठी औद्योगिक पट्ट्याशी जोडलेले आणि शहराशी चांगली कनेक्टिव्हिटी असलेले स्थान आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.
“पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभ्या राहाव्यात, हा माझा सातत्याने प्रयत्न आहे. आय.आय.एम.सारखी प्रतिष्ठित संस्था आपल्या शहरात उभी राहणे ही केवळ शैक्षणिक क्षेत्रासाठी नव्हे, तर संपूर्ण परिसराच्या भविष्यासाठी महत्त्वाची बाब आहे. या संस्थेमुळे उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग क्षेत्राशी समन्वयाला मोठी चालना मिळेल. आज झालेली प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन, प्रशासन आणि संबंधित संस्थांच्या समन्वयातून पाठपुरावा सुरू राहील. पिंपरी-चिंचवडला शिक्षण, संशोधन आणि नवउद्योजकतेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड,



















