
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेने तयारीला वेग दिला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध क्षेत्रांतील बुद्धिजीवी, पदवीधर आणि व्यावसायिक कार्यकर्त्यांचा समावेश असलेली संघटनात्मक टीम तयार करण्यात आली आहे.
पदवीधर मतदारसंघातील संघटनात्मक रचना अधिक सक्षम, व्यापक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध जबाबदाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश अण्णा पिल्ले यांची जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध सामाजिक घटक, युवा, महिला, SC, ST, OBC, शिक्षक-प्राध्यापक, व्यावसायिक तसेच शहरी पदवीधरांशी संपर्कासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे डॉक्टर, CA, वकील, इंजिनीअर तसेच विविध व्यावसायिक पदवीधरांचे प्रतिनिधित्व आणि समन्वयाची जबाबदारी भाजपचे डॉ. अमित नेमाणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील व्यावसायिक आणि उच्चशिक्षित पदवीधरांशी व्यापक संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नियुक्त्यांमध्ये जिल्हा सहसंयोजक म्हणून सौ. वैशालीताई खाडे आणि कुशाग्र कदम, सोशल मीडिया व डिजिटल सेलसाठी सागर विरारी, युवा प्रतिनिधी प्रसाद कस्पटे, महिला प्रतिनिधी कविताताई भोंगळे, SC प्रतिनिधी सागर आंधोळकर, ST प्रतिनिधी प्रमोद परदेशी, OBC प्रतिनिधी गणेश ढाकणे, शिक्षक व प्राध्यापक प्रतिनिधी राजेंद्र बाबर आणि शहरी/महानगर पदवीधर संपर्क प्रतिनिधी म्हणून संजय पटणी यांच्यावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे समाविष्ट आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी आणि संघटनात्मक संपर्काला राजकीय पक्षांकडून महत्त्व दिले जात आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पदवीधर मतदारांची मोठी संख्या आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांतील सुशिक्षित मतदारांचा सहभाग लक्षात घेता, भाजप शहराने उभारलेल्या या संघटनात्मक टीमकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या रचनेतून शहरातील पदवीधरांशी संपर्क आणि संघटनात्मक कामकाजाला किती वेग मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



















