
पिंपळे गुरव (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोरया पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेत कचरा टाकला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष पाहणी व तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. परिसरातील कचरा टाकण्याच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना करण्यात येत आहेत.
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी तसेच डास-माशांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
उप आयुक्त प्रदीप ठेगल यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे आणि आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची कार्यवाही सुरू आहे.
उप आयुक्त प्रदीप ठेगल यांनी सांगितले की, “रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे.”
मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे : “ओला व सुका कचरा वेगळा करून तो केवळ घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.”
आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, “मोरया पार्क परिसरात नियमित पाहणी सुरू आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.”
महत्त्वाचे : कारवाईचा इशारा रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांबाबत आहे. दुकानदार किंवा व्यावसायिकांवर कारवाई झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.



















