
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वायसीएम रुग्णालयातील बालिकेच्या उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर उपचारासंबंधीची संपूर्ण वैद्यकीय कागदपत्रे व सविस्तर वैद्यकीय अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
वायसीएम रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (PICU) कु. पूर्णी सचिन रजत (वय ११ महिने) हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्रामध्ये मृत्यूचे कारण “Hemorrhage due to MODS with DIC with Fluid-Refractory Shock and Viral Encephalopathy” असे नमूद करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणातील उपचारांची संपूर्ण माहिती स्पष्ट होण्यासाठी नढे यांनी रुग्णालय प्रशासनाकडे विविध वैद्यकीय नोंदींच्या प्रमाणित प्रती मागितल्या आहेत.
यामध्ये Emergency/Casualty Admission Notes, PICU विभागातील दैनंदिन उपचार नोंदी व डॉक्टरांच्या Daily Progress Notes, नर्सिंग फ्लो शीट्स, उपचारादरम्यान करण्यात आलेल्या विविध पॅथॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी तपासण्यांचे अहवाल, तसेच बालिकेला देण्यात आलेली जीवनरक्षक औषधे, सलाईन (IV Fluids) आणि रक्त व रक्तघटकांची नोंद यांचा समावेश आहे.
तसेच उपचारादरम्यान वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ व संबंधित डॉक्टरांनी केलेल्या नोंदी, Senior Consultant Case Summary, तसेच रुग्णालयातील संपूर्ण Indoor Case Papers (Complete Indoor Case Sheet/IPD File) आणि Death Summary यांची प्रमाणित प्रत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करून संबंधित अधिकृत वैद्यकीय अभिलेख उपलब्ध करून देण्यात यावेत, जेणेकरून उपचाराची संपूर्ण माहिती स्पष्ट होईल, अशी मागणी विनोद नढे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

















