
ड प्रभागातील अग्निशमन यंत्रणा सक्षम करा; नवीन केंद्रासह वाहन-मणुष्यबळ वाढविण्याची नाना काटेंची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, वाढती लोकसंख्या, गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना आणि उंच इमारतींची संख्या लक्षात घेता अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ड प्रभागांतर्गत प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करून केंद्राच्या कामाला गती द्यावी, तसेच ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विद्यमान अग्निशमन केंद्रावर अग्निशमन वाहने व मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नाना काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात, नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करून प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. केंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
तसेच ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन केंद्रावर आवश्यकतेनुसार अग्निशमन वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. एखादे वाहन अन्य ठिकाणी आपत्कालीन सेवेसाठी गेल्यास संबंधित केंद्रावर वाहनांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर आवश्यक संख्येने वाहने कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
वाहनांसोबतच अग्निशमन अधिकारी, जवान आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे नाना काटे यांनी पत्रात म्हटले आहे. उपलब्ध वाहनांचा प्रभावी वापर आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद मिळण्यासाठी मनुष्यबळाची पुरेशी उपलब्धता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित हा विषय असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी आणि नवीन अग्निशमन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.



















