
बिजलीनगर ट्रान्सफॉर्मर आगप्रकरणी ‘दोषी कोण?’; चौकशीची मधुकर बच्चे यांची मागणी
१२ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप; महावितरण-महापारेषणच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल
बिजलीनगर ट्रान्सफॉर्मर आगप्रकरणी चौकशीची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बिजलीनगर येथील महत्त्वाच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला रविवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागून ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे चिंचवडगाव, पिंपरीतील काही भाग, गावडे नगर, रावेतचा बहुतांश भाग, काळेवाडीतील अनेक भाग, चिंचवडे नगर, वाल्हेकरवाडी आदी परिसरातील वीजपुरवठा सुमारे १२ तास खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.या दुर्घटनेच्या मूळ कारणांची सखोल चौकशी करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महावितरण सदस्य मधुकर बच्चे यांनी केली आहे. बच्चे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत.
वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित राहिल्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच रुग्णालयांमधील रुग्ण, घरी उपचार घेणारे नागरिक आणि विविध अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल बच्चे यांनी उपस्थित केला आहे.
“महावितरणकडून ही महापारेषणची चूक असल्याचे सांगितले जात आहे; मात्र महापारेषणकडून चूक मान्य केली जात नसल्यास दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या प्रकाराकडे केवळ नैसर्गिक अथवा तांत्रिक अपघात म्हणून पाहून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न होऊ नये. दुर्घटनेमागील नेमके कारण शोधून संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा अन्य जबाबदार व्यक्तींची चौकशी करावी आणि दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बच्चे यांनी केली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच मानसिक त्रास सहन करावा लागला. विशेषतः रुग्णालये आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना झालेला त्रास गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
“या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाईल,” असा इशाराही मधुकर बच्चे यांनी दिला आहे.
बिजलीनगर येथील या दुर्घटनेची तांत्रिक कारणमीमांसा करून जबाबदारी निश्चित करणे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

















