
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविक, नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
“गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे. या उत्सवाच्या काळात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एका नागरिकालाही अपघाताला सामोरे जावे लागू नये, ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे नाना काटे यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची व्यापक पाहणी करून रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग, विसर्जन मार्ग, प्रमुख चौक तसेच गर्दीची ठिकाणे यांची विशेष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण आणि रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
“शहर खड्डेमुक्त करण्याचा विषय केवळ नियमित प्रशासकीय काम म्हणून न पाहता नागरिकांच्या जीविताशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून गांभीर्याने घ्यावा. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा,” असेही नाना काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

















