
१८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज; अंतिम फेरी २८ ऑक्टोबरला मुंबईत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने ‘नाट्यकलेचा जागर’ उपक्रमांतर्गत सलग तिसऱ्या वर्षी खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कलावंत, नाट्यकर्मी, विद्यार्थी, महाविद्यालये आणि हौशी नाट्यसंस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या स्पर्धेची माहिती दिली. तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कलावंतांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे उपाध्यक्ष (उपक्रम) व पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
मागील वर्षी राज्यातील विविध केंद्रांवर या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तब्बल २५८ एकांकिका महोत्सवात सादर झाल्या होत्या. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळाही घेण्यात आली होती. नामवंत दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री यांच्या मार्गदर्शनामुळे अंतिम फेरीतील एकांकिकांचा दर्जा उंचावला.
मागील वर्षी प्रथम क्रमांक पटकावलेल्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करण्यात आले. या नाटकाचे आतापर्यंत १०० प्रयोग झाले असून, त्यापैकी २५ प्रयोग महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या विविध शाखांमध्ये सादर करण्यात आल्याची माहिती प्रशांत दामले यांनी दिली.
तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा
‘नाट्य परिषद करंडक’ स्पर्धा प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबरअखेर महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर होईल. त्यातून निवडलेल्या एकांकिकांची विभागीय फेरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा-माहिम, मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकांकिका स्पर्धेचे केंद्र उपलब्ध करून देण्याचा परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका प्राप्त होतील, त्या ठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे.
विजेत्यांना रोख पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांसाठी विविध रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट, उत्तम आणि दोन उत्तेजनार्थ एकांकिकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच लेखन-दिग्दर्शन, स्त्री व पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा व वेशभूषा आदी विभागांतही वैयक्तिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. सर्व सहभागी कलावंत व तंत्रज्ञांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १ हजार रुपये असून प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२६ आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या कलावंतांसाठी नामवंत दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या उपक्रमातून राज्यातील गुणवंत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच उत्कृष्ट एकांकिकांचे व्यावसायिक नाटकात रूपांतर व्हावे, यासाठी नाट्य परिषद प्रयत्नशील राहणार आहे.
विद्यार्थी, कलावंत, महाविद्यालये, हौशी नाट्यसंस्था तसेच विद्यापीठ व महाविद्यालयांच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाऊसाहेब भोईर, मेघराज राजे भोसले, सुरेश धोत्रे, सुहास जोशी, दीपक रेगे, समीर हॅम्पी आणि सत्यजित धांडेकर यांनी केले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मध्यवर्ती मुंबई 8591706887 या क्रमांकावर संपर्क साधावा पिंपरी चिंचवड केंद्र समन्वयक राजेंद्र बंग 9822313066 यांच्याशी संपर्क साधावा.

















