
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणच्या कामादरम्यान विजेचा धक्का लागून २९ वर्षीय एजाज मसूद शेख यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महावितरणच्या दोन अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राहुल चंद्रकांत कांबळे (वरिष्ठ तंत्रज्ञ) आणि तात्या अप्पासा भंडारे (सहाय्यक अभियंता) यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील साते गावाच्या हद्दीत गावठाणालगत डी.पी.वर काम करत असताना एजाज शेख यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील सूर्य सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ७.२० वाजता एजाज शेख यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, एजाज शेख हे महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून काम करत होते. काम सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद असल्याची खात्री न करता तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची आवश्यक काळजी न घेतल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसला. या निष्काळजीपणामुळेच एजाज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उमेश पुंडलिक जाधवराव, पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

















