
‘फॉरेव्हर २०’! ३१ वर्षे शिकवूनही विद्यार्थ्यांच्या वयाच्याच डॉ. स्मिता पाटसकर राहिलेल्या शिक्षिका
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांतून नवी ऊर्जा घेणाऱ्या डॉ. स्मिता पाटसकर यांचा अनोखा शिक्षकी प्रवास
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “प्रत्येकाचे वय त्याच्या जन्मदिनी वाढत असते; पण माझे वय वाढतच नाही. ते वर्षानुवर्षे वीसच आहे, कारण मी एक शिक्षिका आहे!” — डॉ. स्मिता पाटसकर यांच्या या शब्दांत त्यांच्या ३१ वर्षांच्या शिक्षकी प्रवासाचे सार दडले आहे.
स्थापत्य अभियांत्रिकीसारखा तांत्रिक विषय शिकवताना विद्यार्थ्यांच्या बदलत्या पिढ्यांसोबत स्वतःलाही सतत बदलत ठेवणाऱ्या डॉ. स्मिता पाटसकर यांचा प्रवास केवळ एका शिक्षिकेचा नाही, तर विद्यार्थ्यांकडूनही सतत शिकत राहणाऱ्या गुरूचा आहे.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. पाटसकर यांच्या वर्गात दरवर्षी विद्यार्थी बदलतात; मात्र त्यांचा उत्साह कायम असतो. अतिहुशार, हुशार, सर्वसामान्य, अभ्यासू, व्रात्य, गंभीर, उत्साही अशा विविध स्वभावाच्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन विषय समजावून सांगण्याचे आव्हान त्या स्वीकारतात.
“मी तेच तेच शिकवते, पण विद्यार्थी दरवर्षी नवीन असतात,” ही त्यांची शिकवण्यामागची भूमिका आहे. मागील बॅचमध्ये एखादा विषय समजावून सांगताना आलेली अडचण लक्षात ठेवून पुढील वर्षी अध्यापनाची पद्धत बदलणे, विद्यार्थ्यांची आकलनशक्ती ओळखणे आणि त्यानुसार शिकवणे, हा त्यांच्या अध्यापनाचा विशेष भाग आहे.
पंधराव्या मिनिटाला विद्यार्थी दुसऱ्या दुनियेत!
स्थापत्य अभियांत्रिकी हा विषय विद्यार्थ्यांना परिचित असला तरी त्यात नवीन आणि मनोरंजक काय सांगायचे, याचा सतत विचार करावा लागतो. वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष कायम राहावे यासाठी त्या शिकवण्याच्या पद्धतीत विविधता आणतात.
एखादा विद्यार्थी लक्ष देत नसेल तर त्याला उठवणे, प्रश्न विचारणे, थोडे रागावणे असे प्रकारही करावे लागतात. मात्र काळाच्या ओघात त्यांनी विद्यार्थ्यांवर राग करण्यापेक्षा संयम आणि सबुरी महत्त्वाची असल्याचे शिकून घेतले.
एकच विषय दोन-तीन वेळा समजावून सांगतानाही त्या पहिल्यांदाच शिकवत असल्याच्या उत्साहाने शिकवतात. कधी त्याचा परिणाम मिळतो, तर कधी एखादा तास स्वतःलाही अपेक्षेप्रमाणे जमला नाही, हे त्या प्रामाणिकपणे मान्य करतात.
तांत्रिक विषयातही गोष्टी, चर्चा आणि सुडोकू!
तासाच्या शेवटी विद्यार्थ्यांचा कंटाळा जाणवला की वातावरण हलके करण्यासाठी तांत्रिक विषयांशी संबंधित कथा, उत्पादनवाढीवरील चर्चा, भारतातील किंवा जगातील घडामोडींवरील वादविवाद असे उपक्रम घेतले जातात.
त्यांचा आवडता उपक्रम म्हणजे सुडोकू! प्रत्येक विद्यार्थ्याला सुडोकू सोडवायला दिले जाते आणि सर्वप्रथम सोडवणाऱ्याला चॉकलेट बक्षीस मिळते. त्यामुळे विद्यार्थीही आनंदी आणि शिक्षिकाही खुश!
‘तुम्हीच पाटसकर मॅडम का?’
शिक्षकी पेशाच्या सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांतील एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या वेळी त्या अगदी नवख्या होत्या. त्यांची एकही बॅच अजून कॉलेजमधून बाहेर पडलेली नव्हती.
एकदा स्टाफरूममध्ये नुकताच इंजिनिअर झालेला माजी विद्यार्थी आला. कुणीतरी त्याची त्यांच्याशी ओळख करून दिली. त्याने विचारले, “ओह, तुम्हीच पाटसकर मॅडम का? मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे. तुम्ही खूप छान शिकवता म्हणून!”
तो क्षण त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. “माझी स्वतंत्र ओळख त्या क्षणापासून सुरू झाली,” असे त्या सांगतात. या कौतुकाने त्यांना आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
फळा-खडूपासून आधुनिक अध्यापनापर्यंत
त्यांच्या शिक्षकी प्रवासात अध्यापनाच्या तंत्रज्ञानातही मोठे बदल झाले. सुरुवातीला फळा, खडू आणि डस्टर एवढेच साधन होते. त्यानंतर पारदर्शक प्लास्टिक कागदांवरील ट्रान्स्परन्सी, मार्कर आणि प्रोजेक्शनचा वापर सुरू झाला.
एकाच वेळी दोन-तीन ट्रान्स्परन्सीज वापरून विषय समजावून सांगण्याच्या क्लुप्त्या त्या सहकाऱ्यांशी शेअर करू लागल्या. ‘मुलांना कसे शिकवावे?’ यासाठी विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होत अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास केला.
पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कॉलेज व्यवस्थापनाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्या एकाच वेळी शिक्षिका आणि विद्यार्थिनी अशा दोन्ही भूमिका जगू लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही अधिक व्यापक झाला.
जनरेशन गॅप असूनही विद्यार्थ्यांशी नाते कायम
काळ पुढे सरकला. त्यांचे वय वाढले आणि विद्यार्थ्यांशी असलेले वयाचे अंतरही वाढले. जनरेशन गॅपमुळे कधी अस्वस्थता जाणवली; पण विद्यार्थ्यांची ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचत राहिली.
विद्यार्थी कल्याणाशी संबंधित विविध समित्यांमध्ये काम करताना त्यांना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक जवळून समजले. सध्या ‘अधिष्ठाता, विद्यार्थी कल्याण’ या पदावर असल्यामुळे त्यांचा मोठा वेळ विद्यार्थ्यांसोबत जातो.
“त्यांच्या मनात अनेक कल्पना असतात. आपण फक्त त्यांना टेकू द्यायचा असतो,” हा त्यांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे.
३१ वर्षांत हजारो आठवणींची शिदोरी
गेल्या ३१ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत असंख्य विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले. आजही अनेक माजी विद्यार्थी केवळ त्यांना भेटण्यासाठी कॉलेजमध्ये येतात.
काही जण तज्ज्ञ वक्ते म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. मानधन देऊ केले तरी नकार देतात. जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगतात, शिक्षकांची चौकशी करतात आणि आपल्या बॅचमधील मित्रमैत्रिणींबद्दल विचारतात.
एखादा माजी विद्यार्थी मोठ्या पदावर पोहोचल्याचे कळले की त्यांना विशेष आनंद होतो.
कधी हेच माजी विद्यार्थी बाहेर एकमेकांना भेटतात आणि गप्पांमध्ये पाटसकर मॅडमचा विषय निघतो. “मॅडम रागवायच्या, पण त्या किती योग्य बोलायच्या याचा प्रत्यय आता येतो,” असे विद्यार्थी सांगतात. हे ऐकताना एका शिक्षिकेचे कान तृप्त होतात.
आजही माजी विद्यार्थी भेटायला आले की त्यांच्या टेबलावरील चॉकलेटच्या डब्यातून एक चॉकलेट आवर्जून घेऊन जातात. काही क्षणांत वर्षे मागे फिरतात. शिक्षिका आणि विद्यार्थी पुन्हा एकदा त्याच वयाचे होतात.
आणि म्हणूनच डॉ. स्मिता पाटसकर अभिमानाने विचारतात—
“मग, आहे की नाही मी ‘फॉरेव्हर २०’?”

















