
‘तुमचे प्रकरण कोर्टात टिकणार नाही’; योगेश बहलांना विनोद नढेंचा थेट इशारा
तहकूब सभा आणि विषय घेऊन न्यायालयात जाण्याच्या भूमिकेवरून महासभेत भाजप-राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांनी सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयात जाण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी बहल यांना थेट प्रत्युत्तर दिले.
“तहकूब सभा आणि विषय घेऊन कोर्टात जाण्याचा अट्टाहास करू नका. तुमचे प्रकरण कोर्टात टिकणार नाही,” असा थेट इशारा नढे यांनी बहल यांना दिला.
विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर सभेतील निर्णयांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा योगेश बहल यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून नढे यांनी बहल यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
दरम्यान, सभागृहात बोलण्याची परवानगी मिळावी यासाठी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी महापौरांकडे विनंती केली. पायाला दुखापत झाल्यामुळे बसून बोलण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर सभागृहातील वातावरण काही काळ चर्चेचा विषय ठरले.
विशेष सभेच्या वैधतेवरून सुरू झालेला हा वाद आता न्यायालयीन लढाईपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजप आणि राष्ट्रवादीमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

















