
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आक्षेप माजी महापौर योगेश बहल यांनी घेतला आहे. याप्रकरणी ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटेड एलएलपीच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, महापौर आणि नगरसचिव यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
२० ऑगस्ट रोजी झालेली महापालिकेची सर्वसाधारण सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली होती. या सभेच्या विषयपत्रिकेतील प्रलंबित विषय १७ सप्टेंबरच्या तहकूब सभेतच नियमानुसार मांडणे अपेक्षित असताना, त्यातील काही विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आल्याचा आक्षेप बहल यांनी घेतला आहे.
२० ऑगस्टच्या सभेच्या विषयपत्रिकेत एकूण ३१ विषय होते. त्यापैकी १८ निवडक विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत घेण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे विषय दुसऱ्या सभेत घेण्यामागचे कारण काय, असा सवालही बहल यांनी उपस्थित केला आहे.
तहकूब झालेली सभा ही मूळ सभेचेच कायदेशीर सातत्य मानले जाते, त्यामुळे तिचे प्रलंबित विषय अन्य सभेत घेणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींच्या विरोधात असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. एकाच विषयाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सभांच्या कायदेशीर कक्षेत ठेवता येणार नाही, अशी भूमिका बहल यांनी मांडली आहे.
त्यामुळे २ सप्टेंबरच्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेतून २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील समान व ओव्हरलॅपिंग विषय तातडीने वगळावेत आणि ते केवळ १७ सप्टेंबरच्या तहकूब सभेतच चर्चेसाठी ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा या कथित बेकायदेशीर कार्यवाहीविरोधात सक्षम न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशारा योगेश बहल यांच्या वतीने देण्यात आला आहे.

















