
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमधील कथित आर्थिक अफरातफर व गैरव्यवहाराच्या प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या संचालिका तथा नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी केला आहे. संबंधित तक्रारीच्या तपासाला गती दिली जात नसून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांच्या या कार्यपद्धतीला वैतागून आता त्या पोलीसांची राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहेत.
अनिता काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी न्यू सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे त्यांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार, सुधीर निगडे हे पूर्वी त्यांच्या संस्थेत कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर, आर्थिक गैरव्यवहार आणि निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत आवश्यक कागदपत्रांसह यापूर्वी तक्रार देण्यात आली होती.
तत्कालीन सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी, तसेच पिंपळे सौदागर पोलीस ठाण्यातील तत्कालीन व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही कारवाई झाली नसल्याचा दावा काटे यांनी केला आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधून तक्रारीचा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, तपासात अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संस्थेचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठाम दावा करत, पूर्वीच्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई झाली, याची लेखी माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, कोणतीही कारवाई झाली नसल्यास त्यामागील कारणांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
“तक्रारीनंतरही निष्पक्ष आणि सखोल चौकशी होत नसल्याने आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. उपलब्ध पुरावे व कागदपत्रांच्या आधारे दोषींवर कारवाई व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. याबाबत सांगवी पोलिसांकडून ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तसेच संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी या मागणीसाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लवकरच निवेदन देणार आहोत.” – अनिता संदीप काटे, संचालिका – चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर, नगरसेविका – पिं-चिं.मनपा…
“या प्रकरणाबाबत न्यू सांगवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.”

















