
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटूनही विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) माध्यमातून थेट रक्कम जमा करण्याचा आदेश तातडीने देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात कोल्हटकर यांनी शालेय साहित्य खरेदी प्रक्रियेत ठेकेदारीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला आहे. आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, मात्र तो स्थायी समितीने फेटाळल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा ठेकेदारीचे हित जपले जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्थायी समिती व शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही राज्य शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्याचा निर्णय घ्यावा, तसेच आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संबंधित विभागांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी कोल्हटकर यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
















