
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी सेक्टर 22 परिसरातील दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीची तसेच पीसीएमसी कॉलनीतील जीर्ण इमारतींच्या समस्येची महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांनी पूरप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह कॉलनीतील इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली.
प्रभाग क्रमांक 13 मधील संग्रामनगर झोपडपट्टी, श्रमिकनगर, राहुलनगर, फातिमा मस्जिद परिसर तसेच पीसीएमसी कॉलनीतील 1 ते 15 क्रमांकाच्या इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरत असल्याने नागरिकांचे घरगुती साहित्य, अन्नधान्य व अन्य वस्तूंचे नुकसान होत असल्याची बाब नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राहुलनगर ते निगडी स्मशानभूमीपर्यंत कॅन्टोन्मेंटच्या माळरानावरून येणारे पावसाचे पाणी थेट स्मशानभूमीमागील नाल्याला जोडण्यासाठी मोठा पावसाळी नाला उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
तसेच पीसीएमसी कॉलनीतील जीर्ण इमारतींच्या दुरुस्तीचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर महापौरांनी नागरिकांना आश्वस्त करत, “पीसीएमसी कॉलनीतील सर्व इमारतींची दुरुस्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केली जाईल,” असे सांगितले.
या पाहणीवेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले- मराठे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राजू केरप्पा गायकवाड, अक्षय करंडे, प्रबुद्ध कांबळे, शेहना हाजी शेख, अल्ताफ शेख, नजीर शेख, गणेश वाघमारे, मंगेश जाधव, रेखा सूर्यवंशी, दिपाली जाधव, रेखा भोसले, सुवर्णा सूर्यवंशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















