
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या मुख्य प्रवक्तेपदी माजी नगरसेवक तथा अभ्यासू वक्ते राजू अनंत दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दुर्गे यांचे अभिनंदन करताना सांगितले की, पक्षाची तत्त्वप्रणाली, केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना तसेच महापालिकेच्या विकासकामांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील. विरोधकांच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला तथ्यांच्या आधारे उत्तर देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना राजू दुर्गे म्हणाले, “पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे, विचारसरणी आणि शहरातील विकासकामे प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करेन.”
















