
कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत जिल्हाभरातील ४०० हून अधिक कॅरमपटूंचा सहभाग
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ चा शुभारंभ आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
चिंचवड येथील कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी आयोजित या स्पर्धेत पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दि. २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४०० हून अधिक कॅरमपटू आपल्या कौशल्याची चुरस दाखविणार आहेत.
कॅरमसारख्या बौद्धिक, कौशल्याधारित आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या खेळाला प्रोत्साहन देणे, नवोदित खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहरात क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना एकूण ₹३.५६ लाखांची रोख पारितोषिके तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील तसेच जिल्हाभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले,“कॅरम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, अचूकता आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ आहे. महापौर चषक कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील आणि जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे. अशा स्पर्धांमधून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळते, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळते. सर्व स्पर्धकांनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, हीच शुभेच्छा.”
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले,“कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृती जपणारी ही स्पर्धा त्यांच्या क्रीडाप्रेमाचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी वारसा पुढे नेणारी आहे. महापौर चषकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना समान संधी मिळत असून, अशा स्पर्धांमधून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.”
















