
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आणि क्वालिटी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे दिनांक २७ व २८ जुलै २०२७ रोजी २७व्या स्वरसागर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु यांच्या कलासाधना भरतनाट्यम अकॅडमीच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी स्वर सागर महोत्सवामध्ये मंगळवार दिनांक २८ जुलै २०२६ रोजी भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती केली. यामध्ये पारंपारिक नृत्य रचना: शिवतांडव स्तोत्र, तोडायमंगलम, तिल्लाना आणि अभंग याचा समावेश होता. राधिका बाग, केतकी सहस्त्रबुद्धे, श्रावणी सरदेसाई, वैभवी महाजन अद्वी देशपांडे, श्रीहिता वज्जला, टीना वैद्य, प्रांजल पाटील आणि प्रचिती सोनावणे या सर्व स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारास प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
महादेवाच्या रौद्र, दिव्य, विश्वव्यापी स्वरुपाचे प्रभावी वर्णन करणारे शिवतांडव स्तोत्र, श्री नारायणाच्या विविध अवतारांचे वर्णन करणारे तोडायमंगलम, नृत्यादी देवता नटराज कडून आशिर्वच मागणारा तिल्लाना आणि विठुरायाला आर्त साद घालणारा ‘हरी म्हणा’ हा अभंग या सर्वच नृत्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
नृत्यमंजरी कला केंद्राच्या विद्यार्थिनी अदिती कोंढरे यांनी स्वरसागर महोत्सवांतर्गत दोन प्रभावी स्त्री शक्ती यावर भरतनाट्यम् रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.
देवी कौतुकम- छंदताल या वैशिष्ट्यपूर्ण तालरचनेत निबद्ध असलेल्या या रचनेत आदिशक्तीची तीन दिव्य रूपे साकारली आहेत—विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती, समृद्धीची अधिष्ठात्री महालक्ष्मी, आणि शक्ती, धैर्य व संरक्षणाचे प्रतीक असलेली अंबामाता व स्त्री कौतुकम – कन्या, भगिनी, पत्नी, माता तसेच आजच्या आधुनिक युगातील आत्मनिर्भर, कर्तृत्ववान स्त्री—प्रत्येक भूमिकेत ती आपल्या सामर्थ्य, संवेदनशीलता आणि जिद्दीच्या बळावर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत असते. ताल – चतुश्र एकं ‘देवी कौतुकम्’ आणि ‘स्त्री कौतुकम्’ या दोन्ही रचनांच्या रचनाकार गुरु स्मिता महाजन असून, त्यांचे नृत्यदिग्दर्शन (कोरिओग्राफी) डॉ. गौरी वैद्य काळे यांनी केले आहे. अदिती कोंढरे या त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे शिक्षण घेत आहेत.
महोत्सवाची सांगता विख्यात गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या अभंगरंग आणि शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने झाली. हार्मोनियमवर कुमार करंदीकर आणि तबल्यावर धनंजय शालीग्राम शिष्यवर्ग रुची शिरसे, निशिगंध देशमुख आणि मनिषा पिंपळगावकर, नितिन महाबळेश्वर होते. परिचय संजय कांबळे यांनी करून दिला.
राग यमनमधील दोन बंदिशी, अतिद्रुत सरगम तसेच विविध अभंगांचे सादरीकरण केले. यामध्ये ‘अबीर गुलाल’, ‘अमृताहूनही गोड’, ‘कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर’, ‘बाजे मुरलिया बाजे’ आणि ‘श्रीरामचंद्र कृपाळू’ या रचनांचा समावेश होता. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी, गानसरस्वती लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या रचनाही सादर केल्या. या बहारदार मैफलीने २७ व्या स्वरसागर संगीत महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.
महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री. प्रवीण तुपे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे सदस्य श्री. अनिल गालिंदे यांनी समारोप प्रसंगी पत्रकार, रसिक प्रेक्षक, कलाकार तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
















