
पंढरपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विठूरायाला आपलं सगळं मागणं माहित असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव; महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे असे साकडे विठ्ठलाकडे घातले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात शासकीय महापूजा संपन्न झाली. विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या राज्यभरातील लाखो भाविकांमुळे पंढरपुरात भक्तीचा महासागर फुलला आहे. चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सध्या पंढरपुरात वीस लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी असलेली दर्शनरांग पाच किलोमीटरच्या पुढे गेली असून दर्शनासाठी अठरा ते वीस तास लागत आहे. कोणत्याही भाविकांची दर्शन रांगेत गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीने पूर्ण काळजी घेतली आहे. दर्शन रांगेत भाविकाना पिण्याचे पाणी, चहा, खिचडी देण्यात येत आहे.
महापूजेनंतर भावना व्यक्त करताना शासकीय महापुजेतील मानाचे वारकरी बाळासाहेब माने म्हणाले, “मी गेल्या वीस वर्षांपासून एकही आषाढी वारी चुकवलेली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मला आणि माझ्या पत्नीला शासकीय महापूजेचा मान मिळाला, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेता आले, यापेक्षा मोठे भाग्य नाही.” यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी संपूर्ण राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करत, “पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव. राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद नांदो,” असे साकडे घातले.















