
सलग दुसऱ्या वर्षी कामगार वारकरी मेळावा व सांगता समारंभ; दोन हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग अपेक्षित
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडी, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी (दि. २५ जुलै) भव्य दिंडी, कामगार वारकरी मेळावा व सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रमिक, वारकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व धर्मीय भाविकांना वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भोसले म्हणाले की, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता संत तुकाराम नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून दिंडीला प्रारंभ होईल. मंदिराचे व्यवस्थापन श्री दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, दिंडीत श्री विठ्ठल-रुक्मिणींची प्रतिमा, संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तसेच माऊलींची पालखी सहभागी होणार आहे.
तुकारामनगर, वल्लभनगर आणि महेशनगर परिसरातून मार्गक्रमण करत ही दिंडी दुपारी सुमारे २.३० वाजता आचार्य अत्रे रंगमंदिरात पोहोचेल. त्यानंतर कामगार वारकरी मेळावा, वैष्णव मेळावा, भजन-कीर्तन तसेच सांगता समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देहू व आळंदी येथील कीर्तनकार, भजनी मंडळे, वारकरी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या दिंडीत सुमारे दोन ते अडीच हजार श्रमिक, वारकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटकांतील भाविक सहभागी होणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार महेश लांडगे, शंकरशेठ जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
“वारकरी संप्रदाय हा समाजात समता, बंधुता, सेवा आणि मानवतेची प्रेरणा देणारा आहे. या पवित्र सोहळ्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल भक्तीचा आनंद घ्यावा,” असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.















