
रेड झोनमुक्ती, राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल आणि शहराच्या पायाभूत विकासासाठी विविध केंद्रीय मंत्र्यांकडे महत्त्वाच्या मागण्या
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी दिल्ली दौऱ्यात विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत शहरातील प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील विकास आराखडा केंद्र सरकारसमोर मांडला. रेड झोनमुक्ती, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक सुविधा, क्रीडा विकास, महिला उद्योग क्लस्टर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शहरातील रेड झोनमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. बांधकाम परवानग्या, पुनर्विकास, मालमत्ता व्यवहार आणि बँक कर्जांवरील निर्बंध दूर करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, राज्य सरकार आणि महापालिकेची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. तसेच राजनाथ सिंह यांना पिंपरी-चिंचवडला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.
यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) आठपदरीकरणासाठी भूमी संपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास कायम ठेवावा, तसेच मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याचीही मागणी महापौरांनी केली.
या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन औद्योगिक, व्यापारी आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.















