
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व सेवाव्रती लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत आकुर्डी येथील महापालिकेच्या ह.भ.प. कै. मल्हारराव कुटे रुग्णालयात “प्रयास फाउंडेशन”च्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी तसेच गर्भाशय मुख कर्करोग तपासणी मोफत करण्यात आली. शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्याविषयी जनजागृती आणि वेळेत निदान होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका अरुणा लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर, गणेश लंगोटे, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. हरिदास शेंडे, डॉ. धीरज तायडे, डॉ. दीपक चौधरी, फिजिशियन शाहीन खान, नारायण जायभाय यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
स्व. अजित पवार यांच्या “जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा” या विचारातून प्रेरणा घेत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. या महाआरोग्य शिबिरामुळे महिलांना मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून, उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.















