
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगदान प्रतिष्ठान, चिंचवड यांच्या वतीने प्रभाग क्र. १८ मधील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयात ९ जुलै २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात दहावीतील १७४ आणि बारावीतील ६८ अशा एकूण २४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पुणे शहर सजग नागरिक मंचाचे प्रमुख विवेक वेलणकर यांनी करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सहज, सोप्या आणि प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देत जीवनात संस्कार, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी योगदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश शिवाजी भोईर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शिक्षण समिती अध्यक्षा रवीना आंघोळकर, नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, क्रांतिवीर स्मारक समितीचे सदस्य गतिरामजी भोईर, रवींद्र प्रभुणे, सोना गडदे, दीपाली कलापुरे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबर चिंचवडे यांनी केले, तर विजयकुमार बोरसे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालेल्या या सत्कार समारंभाने विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचा नवा संदेश दिला.



