
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील प्रसिद्ध निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्प उद्यान आणि प्राणिसंग्रहालय गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या कामामुळे बंद आहे. या महत्त्वाच्या शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या स्थळावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, हे उद्यान लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
उद्यान बंद असल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. उद्यान नेमके कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा केली जात असून प्रशासनाची दिरंगाई नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने सामोरे जावे लागत असून, काम पूर्ण होऊनही उद्यान अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेने या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी खर्च केला आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधेचा लाभ वेळेत मिळणे अपेक्षित असताना, उद्यान दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग होत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उद्यान सुरू होण्यात अडथळा ठरणाऱ्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून उर्वरित कामे प्राधान्याने मार्गी लावावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, उद्यान सुरू करण्याची निश्चित तारीख व कालावधी जाहीर करून नागरिकांची प्रतीक्षा संपवावी आणि भविष्यात अशा सार्वजनिक प्रकल्पांमध्ये अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी भूमिका नगरसेवक तुषार हिंगे यांनी पत्राद्वारे मांडली आहे. ही हजारो नागरिकांच्या भावनाेशी निगडित अत्यंत जिव्हाळ्याची व जनहितारची बाब असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

















