
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूटमध्ये २०२६-२८ या शैक्षणिक वर्षातील नव्या पीजीडीएम विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभातून विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या व्यवस्थापन शिक्षणाच्या प्रवासाची औपचारिक सुरुवात झाली.
व्यवस्थापन शिक्षणासोबतच नेतृत्वगुण, व्यावसायिक कौशल्ये, सातत्यपूर्ण शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. उद्योगक्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना व्यावसायिक क्षेत्रातील बदलते वातावरण आणि अपेक्षांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला फॉरेशिया कंपनीचे कंट्री एचआर डायरेक्टर – इंडिया अनिल अग्निहोत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाचे (PUMBA) माजी प्रमुख प्रा. (डॉ.) कॅप्टन चंद्रशेखर चितळे, अॅमडॉक्सचे डायरेक्टर – सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग रविंदर पाल सिंग आणि ŠKODA AUTO Volkswagen India Private Limited चे डेप्युटी जनरल मॅनेजर – ह्युमन रिसोर्स अँड पीपल सर्व्हिसेस राहुल दाबी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापन शिक्षणाकडे केवळ पदवी मिळविण्याचा मार्ग म्हणून न पाहता, जिज्ञासा, शिस्त आणि सातत्यपूर्ण शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करणे ही यशस्वी व्यावसायिक कारकिर्दीसाठी महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचे कॅम्पस डायरेक्टर रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) आणि डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शलाका पार्कर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासाच्या विविध उपक्रमांना सातत्याने चालना मिळत आहे.
या इंडक्शन समारंभामुळे २०२६-२८च्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण, उद्योगविश्वातील अपेक्षा आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत नवी दिशा मिळाली. नव्या विद्यार्थ्यांसाठी हा समारंभ शैक्षणिक उत्कृष्टता, व्यावसायिक क्षमता आणि नेतृत्व विकासाच्या दिशेने सुरू झालेल्या नव्या प्रवासाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

















