
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट (उद्वाहक) बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी विदयुत विभाग सहशहर अभियंता यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेकडून या सभागृहात विविध साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र सभागृह दुसऱ्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ साहित्यिक, दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांना जिने चढणे-उतरणे त्रासदायक ठरत आहे.
या गैरसोयीमुळे अनेक मान्यवर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास अडचणी व्यक्त करत असल्याचे भोईर यांनी सांगितले. शहराच्या सांस्कृतिक व साहित्यिक विकासाच्या दृष्टीने सभागृहात लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संत तुकाराम व्यापारी संकुलातील शांता शेळके सभागृहासाठी विनाथांबा स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



