
ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा आरोप; ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड परिसरातील वीज ग्राहकांच्या “टी.ओ.डी.” (Time Of Day) मीटर संदर्भात महावितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, व्यावसायिक व उद्योजक यांच्या वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया ग्राहकांना योग्य माहिती न देता व त्यांची संमती न घेता केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, वीज ग्राहकांना मीटर बदलण्याबाबत पूर्वसूचना देणे, नवीन मीटरची कार्यपद्धती समजावून सांगणे तसेच ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. मात्र संबंधित प्रक्रियेत ग्राहकांच्या हरकती व शंकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच, ग्राहकांच्या घरातील मीटर बदलताना पारदर्शक प्रक्रिया राबवावी, ग्राहकांना विश्वासात घ्यावे आणि सर्व नियमांचे पालन करावे, अशी मागणी नोटीसमधून करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिलेल्या या नोटीसमध्ये पुढे नमूद केले आहे की, ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रकरण न्यायालयात नेण्यात येईल. महावितरणने याबाबत तातडीने योग्य कार्यवाही करून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.



