
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंजुमन इत्तेहाद तांबोलीयान जमात, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजित “Talented Students Encouragement & Felicitation Program 2026” हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गफ्फार सर (प्राचार्य, अबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे), प्रा. अनीस कुट्टी सर (शैक्षणिक समुपदेशक) आणि प्रा. मुबीन तांबोळी सर (मोटिव्हेशनल स्पीकर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना करिअर निवड, उच्च शिक्षणाच्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य वृद्धी आणि भविष्यातील स्पर्धात्मक आव्हानांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणांच्या शर्यतीत न अडकता स्वतःच्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांचा विचार करून करिअरची दिशा निवडण्याचा सल्ला दिला. पालकांनीही मुलांच्या आवडी-निवडी समजून घेत त्यांना योग्य पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तर सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी विविध करिअर पर्याय, अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या संधींबाबत प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी त्यांची समाधानकारक उत्तरे देत उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंजुमन इत्तेहाद तांबोलीयान जमातचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालक, विद्यार्थी आणि समाजबांधवांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक जनाब अब्बास भाई तांबोळी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर जमातीचे उपाध्यक्ष जनाब कमरुद्दीन भाई तांबोळी यांनी उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि समाजबांधवांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमातीचे अध्यक्ष हाजी ताजुद्दीन भाई तांबोळी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि उत्स्फूर्त सूत्रसंचालन प्रा. मुबीन तांबोळी यांनी केले.



