
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती असलेली अधिकृत डायरी नगर सदस्य, पत्रकार तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, सूचना व समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि अधिकाऱ्यांना सातत्याने परस्पर संपर्क साधावा लागतो. मात्र संबंधित विभागांचे कार्यालयीन पत्ते, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ते व आवश्यक माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वी सन २०१७ पर्यंत महापालिकेकडून दरवर्षी अधिकृत डायरी उपलब्ध करून दिली जात होती. मात्र त्यानंतर ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा सर्व विभागांची माहिती समाविष्ट असलेली अद्ययावत डायरी तयार करून ती नगर सदस्य, पत्रकार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या डायरीमध्ये विभागांचे कार्यालयीन पत्ते, विभाग प्रमुख व अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल पत्ते, विभागनिहाय जबाबदाऱ्या, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच महापालिकेच्या समित्यांची माहिती समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही डायरी उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करणे सोपे होईल, तसेच प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होऊन नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल, असे भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे.



