चिखलीकरांना दिलासा मिळाला; महेश लांडगेंनी शब्द केला खरा..!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखलीतील वाहतूक सक्षम करण्यासासाठी प्रस्तावित रस्ते मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी दिलेला ‘शब्द’ अखेर ठरला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह सोसायटीधारकांना दिलासा मिळाला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९९ साली टाळगाव चिखली आणि तळवडे गावचा समावेश झाला आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, चिखली-मोशी-चऱ्होली असा सर्वात मोठा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. चिखली गावाला ऐतिहासिक वारसा आहे. तसेच, औद्योगिक व निवासी क्षेत्राला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून चिखलीची ओळख आहे.
तळवडेत आयटी पार्क आणि औद्योगिक पट्टा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. श्री क्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता चिखलीतून जातो. चाकण औद्योगिक पट्यातून ये-जा करणारे कामगार, कष्टकरी, तळवडे एकआयडी, जाधववाडी भागातील व्यावसिक पट्टा या भागातून मोठ्या प्रमाणात चिखलीतून रहदारी होत असते. त्यामुळे विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांना गती द्यावी. या करिता चिखली ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठरावही केला होता. त्यानंतर मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले होते.
तसेच, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनाही ग्रामस्थांनी प्रस्तावित रस्ते मार्गी लावण्याबाबत सांकडे घातले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक १ चिखलीमधील देहू आळंदी ते सोनवणे वस्तीकडे जाणारा ३० मीटर रुंद डी.पी. रस्ता, चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणारा २४ मीटर रुंद रस्ता आणि इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठाकडे जाणारा १८ मीटर रुंद डी.पी. रस्त्याच्या कामाची महापालिका स्थापत्य विभागाने सुमारे ६२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. दि. २७ फेब्रुवारी रोजी निविदा खुली होणार आहे. त्यामुळे मार्च- २०२४ मध्ये कार्यादेश काढला जाईल. तसेच, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रस्त्याचे भूमिपूजन होईल, अशी शक्यता आहे.
माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, चिखलीचा समावेश महापालिका हद्दीत झाल्यापासून विकासापासून वंचित राहिले होते. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने या गावातील प्रलंबित विकासकामांना गती मिळाली. स्थानिक नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांना रस्त्यांची कामे मार्गी लावण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी ‘‘कोणत्याही परिस्थितीत रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येईल..’’ असा शब्द आमदार लांडगे यांनी दिला होता. तो शब्द आज खरा ठरला आहे.
चिखली आणि परिसरातील वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. यासाठी स्थानिक नागरिक, ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले. आता निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात करावी. पर्यायी रस्ते निर्माण झाल्यामुळे चिखली आणि परिसराची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहनचालक- नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.