पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी बिलावरील विलंब दंडाबाबत नागरिकांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका सारिका विशाल मासुळकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मासुळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी मालमत्ता करावरील विलंब दंडावर अभय योजना लागू केली होती. या योजनेमुळे अनेक थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळाला तसेच महापालिकेच्या महसुलातही वाढ झाली. त्याच धर्तीवर आता पाणी बिलावरील विलंब दंडावर देखील अभय योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील अनेक नागरिक विविध कारणांमुळे पाणी बिलाची थकबाकी भरू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर विलंब दंडाचा मोठा आर्थिक भार वाढत आहे. जर पाणी बिलाच्या विलंब दंडावर अभय योजना लागू केली तर नागरिकांना थकबाकी भरता येईल आणि महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल, असे मासुळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
यामुळे शहरातील थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

