पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा निर्णय घेत संजय पटणी यांची जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नेते शत्रुघ्न (बापू) सीताराम काटे यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.
दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात संजय पटणी यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार, जनतेच्या समस्या सोडविणे तसेच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत केलेल्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांसह जनतेच्या प्रगती व कल्याणासाठी अधिक जोमाने काम करून भारतीय जनता पक्षाचे ध्येय-धोरण समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संजय पटणी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
संजय पटणी यांच्या नियुक्तीबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

