थकबाकीदारांना ९०% विलंब दंड सवलत
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा महसूल स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकातर्फे १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या थकबाकीवर एकरकमी भरणा केल्यास मनपा करावरील विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे.
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधा उभारण्यासाठी मालमत्ता कर हा मुख्य महसूल स्त्रोत आहे. आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत अंदाजे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. मात्र, अद्यापही सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे थकबाकी प्रलंबित आहे.
वसुली मोहिमेला गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच विविध माध्यमांतून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या ‘अभय योजना’नुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरल्यासच ९० टक्के विलंब दंड सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया आणि कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापौरांचा विश्वासाचा शब्द
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ९० टक्के विलंब दंड सवलत देण्यात येत आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा.”
प्रशासनाचे आवाहन
महापालिका प्रशासनाच्या वतीने श्रावण हर्डीकर यांनी नमूद केले की, “१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास मनपा करावरील ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू असून थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा.”
मर्यादित कालावधीच्या या योजनेमुळे हजारो थकबाकीदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

