पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. २६ (विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड) मधील रक्षक चौक येथे उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) आणि अंडरपासचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आमदार जगताप यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक सिग्नलमुक्त व वेगवान होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. औंध ते रावेत मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच वाकड फाटा ते औंध आणि पिंपळे निलख ते पुणे या मार्गांवरील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
पाहणीदरम्यान आमदार जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करून पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्याच्या सूचना दिल्या. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या वेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, स्नेहाताई कलाटे, नगरसेवक विनायकदादा गायकवाड, संदीपअण्णा कस्पटे, भाजप नेते सचिनभाऊ साठे तसेच स शहर अभियंता प्रेरणा सिंकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, अप अभियंता निलेश दाते आणि संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रक्षक चौक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

