पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात पार पडणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यपत्रिकेनुसार, या विशेष सभेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमानुसार अध्यक्षांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आवश्यक नियम व तरतुदी लागू राहणार असून, संबंधित विभागीय आयुक्त किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडेल.
स्थायी समितीला महापालिकेची ‘तिजोरीची चावी’ मानले जाते. महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णयांमध्ये स्थायी समितीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी हालचाली वेगाने सुरू असून, या निवडीमुळे महापालिकेतील पुढील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.
नगरसचिव विभागाकडून या विशेष सभेबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आले असून, कार्यपत्रिकेतील विषयांचे विवरण नगरसचिव कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

