पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८, केशवनगर चिंचवड येथे चैतन्य मेडीकोसमोर तसेच उद्यम सहकारी बँकेसमोरील अत्यंत वर्दळीच्या चौकात गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरला मोठा आणि धोकादायक खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या. संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुख्य रस्ता आणि प्रमुख चौकाच्या मधोमध मोठा खड्डा असल्यामुळे दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काही जणांना उपचारासाठी खर्चही करावा लागल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीनंतर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री मधुकर बच्चे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. एवढ्या महत्त्वाच्या चौकात दोन महिन्यांपासून खड्डा कायम असूनही संबंधित विभागाकडून टाळाटाळ का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जखमी झालेल्या नागरिकांच्या नुकसानीस जबाबदार कोण, याबाबतही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
बच्चे यांनी संबंधित विभागाला तातडीने काम करून हा धोका दूर करण्याची सूचना केली असून, अन्यथा नागरिकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. आता प्रशासन याबाबत किती तत्परतेने कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

