बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही; पण, सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार म्हणाले, या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया त्यात राजकारण आणू नये एवढंच सांगायचं आहे. ममता बॅनर्जी यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत चौकशीची मागणी केली होती, त्याला पवार यांनी उत्तर दिले.
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह इतरांचा मृत्यू झाला, पण मला याचे दुःख होत आहे की एखाद्या नेत्याच्या मृत्यूवरून संकुचित राजकारण केले जात आहे. मला याचेही दुःख आहे की ममता बॅनर्जी या निमित्ताने खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत.
…अन् प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. या घटनेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबिय बारामतीत आले आहेत. अपघाताची माहिती समजताच खा. सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार हेलीकॉप्टरने बारामती विमानतळावर दाखल झाले. तिथे शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार होते त्यांना पाहून सुळे आणि पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांची गळाभेट घेत दुःख व्यक्त केले. यावेळी सुळे यांनी, ‘लाडला होता’, असे म्हणत भावनांना वाट मोकळी केली. पवार कुटुंबियांचा विलाप पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विमानतळावर पोहोचताच या अपघाताची माहिती घेतली. यावेळी पवार हे भावुक झाले होते.

















