
पुनावळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन (एमईए), पिंपरी-चिंचवड यांच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त पुनावळे येथील वन विभागाच्या जागेवर विकसित होत असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत सुमारे २,००० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास एमईएचे अध्यक्ष महेंद्र यादव, यशदा ग्रुपचे संचालक वसंत काटे, उद्योजक राजू भिसे, एमईएचे उपाध्यक्ष करंजुले साहेब, विक्रम माने, युवा उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव नवनाथ ढवळे ,रावसाहेब पवार,कल्याण काकडे,सौरभ कोकाटे,सुनील शेजल ,राजेश कुऱ्हाडे तसेच वन विभागाचे अधिकारी राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या अभियानांतर्गत वड, पिंपळ, आंबा, नारळ, सीताफळ तसेच विविध आयुर्वेदिक व देशी वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. भविष्यात विकसित होणाऱ्या या ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळे परिसराचा हरित विकास होण्यास मोठी चालना मिळणार असून नागरिकांना शुद्ध हवा, समृद्ध जैवविविधता आणि निसर्गरम्य वातावरणाचा लाभ होणार आहे.
या वृक्षारोपण मोहिमेत एमईएचे ३०० ते ४०० सदस्य, उद्योजक, त्यांचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक तसेच लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्वांनी आनंदाने वृक्षारोपण केले.
यावेळी वन विभागाचे अधिकारी राठोड सर यांनी विविध वृक्षप्रजातींचे पर्यावरणीय महत्त्व, ऑक्सिजन निर्मिती, कार्बन डायऑक्साइडचे शोषण, जंगलांचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्यात वृक्षांची भूमिका याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान एमईएचे अध्यक्ष महेंद्र यादव यांनी भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. विक्रम माने यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल एमईए आणि वन विभागाचे अभिनंदन करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.
युवा उद्योजक व भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव नवनाथ ढवळे यांनी पुनावळे परिसराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन (एमईए) आणि वन विभागाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, भविष्यात हा ऑक्सिजन पार्क पुनावळे परिसरासाठी एक अमूल्य हरित ठेवा ठरेल.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. यानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
















