असंघटित कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला; अजितदादा पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा” – डॉ. बाबा कांबळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खरा लोकनेता, कामगार-कष्टकरी, वाहतूकदार तसेच ऑटो-टॅक्सी चालकांचा आधारवड असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अचानक निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेने विशेषतः असंघटित क्षेत्रातील लाखो कष्टकऱ्यांसाठी हा दिवस अंधकारमय ठरला असल्याची भावना ऑटो-टॅक्सी कामगार संघटनेचे व असंघटित कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली.
डॉ. कांबळे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गोरगरिबांचे, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांचे, कामगार-कष्टकऱ्यांचे खरे साथीदार होते. त्यांच्या मनात नेहमीच सर्वसामान्य माणसाची काळजी होती. उपमुख्यमंत्री पदावर असतानाही सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यातून गेला आहे.”
एका कार्यक्रमातील आठवण सांगताना त्यांनी नमूद केले की, “दादांनी स्वतःची खुर्ची सोडून एका सामान्य कार्यकर्त्याला ‘ये बाबा, माझ्या खुर्चीवर बस’ असे सांगितले होते. ही आपुलकी, ही मानवता आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची वृत्ती आज कायमची हरपली आहे.”
अजितदादा पवार यांच्या प्रशासनातील जरब, विकासकामांचा वेग आणि राज्याच्या प्रगतीचा स्पष्ट दृष्टिकोन महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरला होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासगतीला मोठा धक्का बसल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले. राज्यातील लाखो असंघटित कष्टकरी आणि देशातील कोट्यवधी कामगारांच्या वतीने एक खरा आधार गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“दादांनी आमच्या संघटनेला आणि कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. आमचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्यासाठी आयुष्यभर झटले. आज तो दीपस्तंभ अचानक विझला असून आम्ही पोरके झालो आहोत,” असे भावुक शब्दांत त्यांनी सांगितले.
शेवटी डॉ. बाबा कांबळे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या आत्म्याला चिरशांतता लाभो, तसेच पवार कुटुंबीयांना, कार्यकर्त्यांना व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















