जेष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांना भारत- श्रीलंका हिंदी गौरव सन्मान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहा जानेवारी जागतिक हिंदी दिनाच्या निमित्ताने पूर्वोत्तर हिंदी अकादमी (शिलाँग) मेघालय, केलनिय विश्वविद्यालय (कोलंबो) श्रीलंका, भारतीय उच्चायोग (कोलंबो) श्रीलंका यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय उच्चायोगाच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात दिनांक ९ ते १३ जानेवारी या कालावधीत भारत- श्रीलंका हिंदी संमेलन २०२६ आयोजित करण्यात आले होते. भारताच्या अठरा राज्यातील आणि श्रीलंका येथील विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, हिंदी सेवी, साहित्यकार निमंत्रित होते. भारत श्रीलंका या दोन देशांच्या पस्तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या तसेच बत्तीस लेखकांनी आपले शोध निबंधाचे वाचन केले. जेष्ठ साहित्यिक प्रा. संजय पवार यांनी आपली अश्वत्थामा ही कविता या प्रसंगी सादर केली.
या दोन दिवसीय संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रा. संजय पवार यांच्या “गद्य क्षणिका रत्नाकर” आणि “त्रिवेणी संसार” या दोन पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंचावर वरिष्ठ अधिकारी तसेच साहित्यिक उपस्थित होते. या समारंभात प्रा. संजय पवार यांचे साहित्यिक योगदान तसेच हिंदी भाषेच्या प्रचार प्रसार आणि सांस्कृतिक संवर्धन कार्यासाठी “भारत- श्रीलंका हिंदी गौरव सन्मान” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान समारोह कार्यक्रमात मंचावर स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राचे निदेशक प्रोफेसर डॉ. अंकुरण दत्ता, विद्यार्थी सल्लागार प्रोफेसर अतिला कोतलावल, प्रोफेसर सुभाषिनी रत्ननायके, भारत श्रीलंका लेखक मिलन शिबिराचे संयोजक आणि पूर्वोत्तर हिंदी अकादमी चे संचालक डॉ. अकेलाभाई उपस्थित होते.
दिनांक ९ ते १३ जानेवारी या दरम्यान आयोजित समारंभात भारताच्या वेगवेगळ्या अठरा राज्यातील तसेच श्रीलंका येथील साहित्यिकात परस्पर संवाद, कवी संमेलन, विचार संगोष्टी, आणि बेन्टोटा, नुवारा एलिया, कॅन्डी, कोलंबो येथील पर्यटन असे आयोजन करण्यात आले होते. श्रीलंकेचे लोकजीवन, प्राकृतिक सौंदर्य, धार्मिक आणि पौराणिक स्थळ दर्शन, साहित्य, कला, इतिहास यांचे साहित्यिकांनी निरीक्षण केले. लेखकीय दृष्टिकोनातून महत्वाच्या या शिबिरातील साहित्यिकांना वक्त्यांनी नव साहित्य निर्मितीबाबत आवाहन केले.
भारतीय उच्च आयोगाच्या दुसऱ्या एका कार्यक्रमात श्रीलंकेतील हिंदी सेवी, साहित्यिक, प्रोफेसर, शिक्षक, विद्यार्थी यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मंचावर श्रीलंकेतील शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. मधुर सेनेविरत्न, उच्चायुक्त डॉ. संतोष झा, उप उच्चायुक्त संलाजल पांडे, तसेच भारतातून डॉ. रणजोध सिंह, डॉ.अकेला भाई, डॉ. मनीष शुक्ल, डॉ. अशोक भाटिया, डॉ. प्रताप मोहन भारतीय, डॉ. जसपालसिंह वळवी, डॉ. ज्ञानेश्वर सोनार, डॉ. रामावतार मेघवाल यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.




















