ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

राष्ट्रीय युवा शेफ स्पर्धेत MSIHMCT चे विद्यार्थी देशात उपविजेते राज्यात संस्थेची कामगिरी ठरली अग्रेसर

केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडून विशेष कौतुक

Spread the love

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी संस्था (MSIHMCT), पुणे येथील विद्यार्थ्यांनी PHDCCI नॅशनल यंग शेफ स्पर्धा २०२५–२६ च्या ग्रँड फिनालेमध्ये उपविजेतेपद पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन (IHM), पुसा, नवी दिल्ली येथे पार पडली.

देशभरातील नामांकित हॉटेल मॅनेजमेंट संस्थांच्या सहभागातून झालेल्या या स्पर्धेत MSIHMCT चे तृतीय वर्षाचे विद्यार्थी कु. आर्या कामत आणि श्री. महेश घुले यांनी अस्सल महाराष्ट्रीयन पाककलेचे नाविन्यपूर्ण सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली. त्यांच्या मेनूमध्ये वर्‍हाडी, कोकणी, खान्देशी तसेच महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतींचे स्वाद पारंपरिकतेसोबत आधुनिक शैलीत प्रभावीपणे मांडण्यात आले होते.

पुरस्कार वितरण समारंभास माननीय केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंग शेखावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले.

या स्पर्धेचे मूल्यमापन नामवंत परीक्षक मंडळाने केले. यामध्ये शेफ मंजीत गिल, शेफ अनिल ग्रोवर, शेफ नंदलाल शर्मा, शेफ देबजीत मजुमदार, शेफ नितीन शेंडे आणि शेफ श्रीनिवास वेंकटेशन यांचा समावेश होता.या यशामागे संस्थेच्या प्राचार्य डॉ. सीमा झगडे, शेफ पूजा पवार तसेच प्रा. देवेश जानवेकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

विद्यार्थ्यांमध्ये पाककौशल्य, सर्जनशील सादरीकरण आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंग शेखावत म्हणाले की, “भारतीय पाककला ही देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असून पर्यटन विकासाचा एक महत्त्वाचा आधार आहे. पारंपरिक ज्ञानावर आधारित पौष्टिक अन्ननिर्मितीत नवोन्मेष करण्याची मोठी संधी युवा शेफसमोर असून अशा स्पर्धांमुळे जागतिक स्तरावर भारतीय पाककलेची ओळख अधिक मजबूत होते.”

प्राचार्य डॉ. सीमा झगडे यांनी सांगितले की, “अशा राष्ट्रीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागते तसेच त्यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक विकसित होते. भविष्यातही MSIHMCT अशा स्पर्धांमध्ये अग्रस्थानी राहील. या यशामुळे संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर अधिक दृढ झाला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button