मंत्रालयातील सोडतीनंतर पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण ठरणार?
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपची सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता असल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित असले तरी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे आणि सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हे महापौरपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत याआधी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि महिला खुला प्रवर्गातून महापौरांना संधी मिळाली आहे. प्रकाश रेवाळे, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव आणि उषा ढोरे यांसारख्या नगरसेवकांनी विविध प्रवर्गांतून महापौरपद भूषवले आहे.
२०१७ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर पहिली अडीच वर्षे भोसरी मतदारसंघाकडे महापौरपद होते. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी सव्वा-सव्वा वर्षे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतरच्या अडीच वर्षांत चिंचवड मतदारसंघातील उषा ढोरे यांनी महिला खुला प्रवर्गातून महापौरपद सांभाळले. मागील अडीच वर्षे महापौरपद चिंचवडकडे राहिल्याने आता ते भोसरीकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
चिंचवड मतदारसंघातील पिंपळेसौदागरचे प्रतिनिधित्व करणारे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने विक्रमी ८४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जात असली तरी मागील पंचवार्षिकमध्ये महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदाची संधी न मिळाल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, भोसरी मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नितीन लांडगे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले असून, मागील कार्यकाळात त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे. भोसरीकडे महापौरपद गेल्यास त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. तसेच, भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हेही महापौरपदाच्या शर्यतीत आहेत. भोसरीकडे महापौरपद राहिल्यास नितीन व रवी लांडगे यांना सव्वा-सव्वा वर्षे संधी देण्याचा पर्यायही चर्चेत आहे.
एकूणच, आरक्षण ‘सर्वसाधारण’ झाल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले असून, महापौरपदासाठी पक्षश्रेष्ठींना तोलामोलाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.




















