पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची मंगळवारी भव्य बाईक रॅलीद्वारे सांगता झाली. आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या बाईक रॅलीने संपूर्ण परिसरात निवडणूक वातावरण तापवले.
ताजनेमाळा चौक, ९० मीटर रोड येथून सुरू झालेली रॅली चव्हेली गावठाण, चव्हेली फाटा, इंद्रगाव गावठाण, अष्टविनायक महाराज मंदिर परिसर, मोशी गावठाण, पुणे–नाशिक महामार्ग मार्गे आर्दशनगर येथे पोहोचली. रॅलीचा समारोप गंधर्वनगरी येथील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आला. रॅलीनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत भाजपच्या अधिकृत उमेदवार सारिका रवींद्र, नितीन (आप्पा) काळजे, अर्चना राजेश सस्ते आणि सचिन (भाऊ) तापकीर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि ‘कमळ’ चिन्हाच्या गजरात परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपच्या प्रचाराची ताकद आणि संघटन स्पष्टपणे दिसून आली. विकास, सुशासन आणि विश्वास या मुद्द्यांवर जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग ३ मध्ये भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

