पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी पिंपळे सौदागर परिसरात भव्य पदयात्रेने झाली. प्रभाग क्रमांक २८ मधील भाजप व आरपीआय (आठवले) युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गंगा पार्क चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा स्वराज गार्डन चौक, सहन स्टार लेन, गोविंद गार्डन रोड, कुणाल आयकॉन रोड, शिवराज चौक, कोकणे चौक, रहाटणी चौक मार्गे विमल गार्डन चौक येथे समारोपाला पोहोचली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करत भाजपच्या विकासात्मक कामांना पाठिंबा दर्शवला.
या वेळी बोलताना भाजप नेत्यांनी “विकास, सुरक्षा आणि विश्वास” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचाराला जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपला मिळणारा वाढता जनसमर्थन पाहता येत्या मतदानात ‘कमळ’ चिन्हासह प्रचंड बहुमताने विजय मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
भव्य उपस्थिती, शिस्तबद्ध आयोजन आणि जनतेचा उत्साह यामुळे भाजपच्या प्रचाराची सांगता ही ताकदीचे प्रदर्शन ठरली असून, निवडणुकीच्या रणांगणात भाजप आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

