पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन आप्पा काळजे यांच्या ‘हॅट्रिक’ विजयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सलग दोन टर्मचा अनुभव, मजबूत संघटनात्मक पकड आणि विकासकामांची ठोस कामगिरी या त्रिसूत्रीवर काळजे यांची निवडणूक मोहीम उभी असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.
गेल्या दोन कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरी सुविधा, तसेच मूलभूत पायाभूत कामांवर दिलेला भर मतदारांच्या स्मरणात आहे. “काम दिसतं, म्हणून विश्वास बसतो” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत असून, याच कामगिरीच्या जोरावर नितीन आप्पा काळजे हॅट्रिक साधतील, असा सूर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे चऱ्होली बु. परिसरात वेगाने वाढणारी लोकसंख्या, नव्या वसाहती आणि नागरीकरणाच्या प्रश्नांवर काळजे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. भाजपच्या संघटनात्मक ताकदीसोबतच स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संपर्क, घरोघरी प्रचार आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे प्रचाराला धार येताना दिसत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, विरोधकांकडून आव्हान असले तरी अनुभव, कामगिरी आणि भाजपचा संघटनात्मक आधार हे नितीन आप्पा काळजे यांचे मोठे प्लस पॉइंट्स ठरत आहेत. त्यामुळेच चऱ्होली बु. प्रभाग ३ मध्ये “हॅट्रिक होणार की नाही?” हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी या चर्चांना अधिक उधाण येताना दिसत आहे.

