पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागात प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढत असताना, प्रभाग ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भव्य पदयात्रेच्या माध्यमातून आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. ढोल-ताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही पदयात्रा लक्षवेधी ठरली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत नगरसेवक उमेदवार नारायण बहिरवाडे यांच्या पॅनलच्या काढण्यात आलेल्या या पदयात्रेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. हातात पक्षाचे झेंडे, छातीवर घड्याळाचे चिन्ह आणि चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास अशा वातावरणात संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उमेदवाराला दिलेला प्रतिसाद हा जनतेच्या विश्वासाची साक्ष देणारा ठरला. विकास, पारदर्शक कारभार आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत नारायण बहिरवाडे यांनी प्रचारात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल” हा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेसने या पदयात्रेतून विरोधकांना थेट राजकीय आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रभागातील लढत अधिक रंगतदार होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या शक्तिप्रदर्शनामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

