प्रभाग क्रमांक ३ मधून मनीषा सिद्धार्थ तापकीर निवडणूक रिंगणात; परंपरा, कार्यकर्तृत्व आणि शाश्वत विकासाचा ठाम अजेंडा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. चऱ्होली, डुडुळगाव, मोशी व लगतचा परिसर समाविष्ट असलेल्या या प्रभागातून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर यांचे नाव पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीला नागरिकांमधून व्यापक पाठिंबा मिळताना दिसत आहे. सुमारे ७२,५०० मतदारसंख्या असलेला हा प्रभाग निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

कैवल्यसम्राट संत ज्ञानेश्वरमाउलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चऱ्होली गावाच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत तापकीर कुटुंबाचे सव्वाशे वर्षांहून अधिक काळ योगदान राहिले आहे. गावाच्या इतिहासात पाटीलकी भूषविलेले लक्ष्मण गणपत तापकीर हे वारकरी संप्रदायातील असून त्यांनी गावकऱ्यांना विनामोबदला सातबारा आदी कागदपत्रांबाबत मोलाची मदत केली. गावातील भजन परंपरा जपणारे प्रमुख भजनकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी तापकीर निवासस्थानी भजनाचा कार्यक्रम आजही आयोजित केला जातो.
त्यांचे सुपुत्र ह. भ. प. भानुदासमहाराज लक्ष्मण तापकीर यांनी शैक्षणिक, क्रीडा व अध्यात्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. श्री वाघेश्वर विद्यालयाचे प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी म्हणून त्यांनी व्हॉलीबॉलच्या माध्यमातून चऱ्होलीचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवले. आरटीओमधील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावलेले भानुदासमहाराज संतसाहित्याचे अभ्यासक म्हणूनही परिचित आहेत. त्यांच्या संस्कारातून पुढील पिढीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे.
संदीपआबा तापकीर हे प्रथितयश साहित्यिक, शिवव्याख्याते व इतिहासअभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. ४५० हून अधिक किल्ल्यांचा अभ्यास, १७ पेक्षा अधिक प्रकाशित पुस्तके, किल्ल्यांवरील पहिला दिवाळी अंक आणि अनेक पुरस्कार अशी त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांनी स्थापन केलेल्या श्री भैरवनाथ आदर्श ग्रंथालयामुळे चऱ्होलीत अनेक साहित्यिक, विचारवंत व मान्यवरांचे आगमन झाले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, पद्मश्री नारायण सुर्वे यांसारख्या दिग्गजांची उपस्थिती याची साक्ष आहे. सध्या ते इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून साहित्य चळवळ जोमाने पुढे नेत आहेत.
श्रीकांतअण्णा तापकीर यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून चऱ्होली व पंचक्रोशीत विश्वासार्ह नेतृत्व निर्माण केले असून २००७ पासून आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. सिद्धार्थअप्पा तापकीर यांनी कोल्हापूरच्या तालमीतून कुस्तीचे धडे घेतले असून सारंग उर्फ नवनाथनाना तापकीर हे वाघेश्वर महाराजांच्या उत्सव नियोजनात नेहमीच अग्रेसर असतात. ‘कारभारी’ म्हणून ओळख मिळवलेल्या सारंगनानांसह सिद्धार्थअप्पा हे कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारे सहृदयी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखले जातात.
राजकीय पातळीवर २००७ पासून चऱ्होली गावात परिवर्तनाची नांदी रोवली गेली. शिवशंकर प्रतिष्ठान व चऱ्होली सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या संघटनात्मक ताकदीतून आमदार महेशदादा लांडगे यांचे नेतृत्व राज्यपातळीवर अधोरेखित झाले. या प्रवासात श्रीकांतअण्णा तापकीर हे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
या पार्श्वभूमीवर सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर यांची उमेदवारी केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक अपेक्षांचे प्रतिबिंब मानली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतलेल्या मनीषाताई सुस्वभावी, अभ्यासू व समाजाशी घट्ट नाळ जुळवून असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या चऱ्होली, डुडुळगाव, मोशी परिसरातील मूलभूत नागरी सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे.
शाश्वत विकासाचा ठोस अजेंडा मांडत मनीषाताई लहान मुलांसाठी क्रीडांगणे व संस्कार केंद्रे, अत्याधुनिक शाळा, तरुणांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी सांस्कृतिक केंद्रे व बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे, आरोग्य सुविधा, रुग्णालये, ग्रंथालये आणि उद्याने उभारण्याचा संकल्प व्यक्त करीत आहेत. अठरा सदस्यांच्या एकत्र कुटुंबपद्धतीचा अनुभव, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविलेले विविध उपक्रम—हळदीकुंकू, खेळ पैठणीचा, रक्तदान शिबिरे, आरोग्यदूतांचा सन्मान, पूरग्रस्तांना मदत, क्रीडा स्पर्धा, यात्रांचे आयोजन व प्रबोधनात्मक व्याख्याने—यामुळे त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
केंद्रीय व राज्यस्तरावर महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही नारीशक्तीला संधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामदैवत श्री वाघेश्वराची कृपा, संतपरंपरेचे आशिर्वाद, तापकीर कुटुंबाची एकजूट, आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन आणि सुजाण मतदारांचा पाठिंबा यांच्या जोरावर सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर प्रभाग क्रमांक ३ मधून विजयश्री खेचून आणतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.



















