काळेवाडीत आज ‘न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’; महिलांसाठी भव्य मनोरंजनात्मक महोत्सव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी परिसरातील महिलांसाठी खास मनोरंजनात्मक व प्रोत्साहनपर उपक्रम म्हणून जिजाऊ महिला प्रतिष्ठान आणि नवनाथदादा नढे सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यू होम मिनिस्टर : खेळ रंगला पैठणीचा’ हा भव्य कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. १३ डिसेंबर २०२५) आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ठीक ५ वाजता विष्णुराज मंगल कार्यालय, ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
काळेवाडी, विजयनगर, ज्योतिबानगर, आदर्शनगर व पवनानगर परिसरातील महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात गप्पा-गोष्टी, मनोरंजनात्मक खेळ, हास्य, तसेच प्रश्नमंजुषेची मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री पूजा काळभोर करणार असून त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची मोठी रेलचेल ठेवण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्यास ई-बाईक व मानाची पैठणी साडी, द्वितीय क्रमांकास फ्रीज, तृतीय क्रमांकास ४३ इंची एलईडी टीव्ही, चतुर्थ क्रमांकास ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, तर पाचव्या क्रमांकास मिक्सर ग्राइंडर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. याशिवाय लकी ड्रॉद्वारे एका भाग्यवान महिलेस सोन्याची नथ भेट देण्यात येणार आहे.
महिलांना धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास व उत्साह निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजिका सौ. मोनिका नवनाथदादा नढे पाटील यांनी सांगितले. काळेवाडी परिसरातील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महिलांच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने सामाजिक पातळीवर महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपक्रम काळेवाडीतील महिलांसाठी एक अनोखी व उत्साहपूर्ण संध्याकाळ ठरणार असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.




















