ट्रोलिंग, माध्यमांवरील वाढत्या दबावाला माध्यम प्रतिनिधींचा विरोध


पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिलदारांना निवेदन
पत्रकार तुषार खरात यांची अटक रद्द करून गुन्हे मागे घेण्याची मागणी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यसरकारकडून माध्यमांवरील वाढता दबाव, सोशल मीडियात पत्रकारांना केले जाणारे ट्रोलिंग तसेच पत्रकार तुषार खरात यांना झालेल्या अटकेचा पिंपरी-चिंचवड शहरातील माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. खरात यांची अटक रद्द करून, गुन्हे मागे घ्यावेत. तसेच पत्रकारांना ट्रोल करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी-चिंचवड अप्पर तहसिलदारांना शहरातील विविध प्रमूख माध्यमातील, युट्यूब आणि वेबपोर्टलच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले.
या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे काम करतात. लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी विरोधी पक्षाची भूमिका निभवत आहेत. या तत्वांनुसार राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले जाताहेत. मात्र काही राज्यकर्त्यांकडून माध्यम प्रतिनिधींवर दबाव आणला जातोय. काही माध्यम प्रतिनिधींना राज्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी ट्रोलिंग करत आहेत. लोकशाही मुल्याला घातक अशा पद्धतीने ही कृती आहे. पिंपरी-चिंचवडसह सर्वच राज्यात हीच परिस्थिती पहायला मिळते.
त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्याची सुडबुद्धीने कारवाई केली आहे. त्यांनी केलेल्या बातम्यांवर राज्य सरकारमधील लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेत ही कारवाई केली. या अटकेचा पिंपरी-चिंचवड मधील माध्यम प्रतिनिधींनी निषेध व्यक्त केला. तसेच खरात यांची अटक तत्काळ रद्द करून त्यांच्यावरील खटले मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच माध्यम प्रतिनिधींना ट्रोल करणारे राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यावरही कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.










