ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान

Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिलादिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍या उषा गर्भे आणि नीलम तुपे यांचा ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांच्या हस्ते विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथे हृद्य सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी, कार्यवाह राजाराम गावडे, संचालक नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकार करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून स्त्रीशक्तीला वंदन करून ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वृषाली मरळ यांनी ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेची शिस्त अन् उपक्रमशीलता याविषयी गौरवोद्गार काढले; तर अश्विनी चिंचवडे यांनी आधुनिक काळात महिलांनी आधुनिकतेची कास धरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना उषा गर्भे यांनी, ‘स्त्रियांच्या विविध नात्यांनी समाज समृद्ध झालेला आहे. ज्येष्ठ महिलांनी किमान एकतरी छंद जोपासावा!’ असे मत व्यक्त केले; तर नीलम तुपे यांनी समाजकार्य हा आवडीचा विषय असल्याचे नमूद केले. यावेळी महापालिका सेविका संगीता जगताप यांचा सत्कार करण्यात आला; तसेच उपस्थित महिला सदस्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

सन्मान प्रसंगी श्यामकांत खटावकर यांनी शंखनाद केला. मंदाकिनी दीक्षित, मंगला दळवी, अलका इनामदार, नीलिमा कांबळे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नंदकुमार मुरडे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. सरला जोशी यांनी कवितावाचन केले. संघाच्या महिला सदस्यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात विशेष परिश्रम घेतले. रत्नप्रभा खोत यांनी सूत्रसंचालन केले. रेवती कुलकर्णी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button